राजकीय पटलावरचा 'हा' चेहरा रूपेरी पडद्यावर

पुढारी, ११,फेब्रुवारी २०१९, विटा : सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावरचा बहुचर्चित चेहरा आता झगमगत्या रूपेरी पडद्यावर दिसणार असून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष व धनगर आरक्षण लढ्याचे प्रमुख गोपीचंद पडळकर हे 'धुमस' या  मराठी चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीत पर्दापण करत आहेत.

धुमस' हा मराठी चित्रपट येत्या १५ मार्चला  महाराष्ट्रातील चित्रपटगृहातून प्रदर्शित होणार आहे. दक्षिणेकडचे ख्यातनाम दिग्दर्शक डी. गोवर्धन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर साक्षी चौधरी ही या चित्रपटात प्रमुख नायिकेच्या भूमिकेत असून तर गोपीचंद पडळकर हे या चित्रपटात प्रथमच नायक म्हणून समोर येत आहेत.

बिगबजेट असणार्‍या चित्रपटाचे कथानक प्रस्थापित यंत्रणेला आव्हान देणारे असून दक्षिणेच्या चित्रपटाच्या धर्तीवर संगीत, गाणी, दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. मराठीमध्ये असा पहिलाच प्रयोग होत असून ताकदीची पटकथा आणि संवाद आहेत. त्यामुळे मराठी रसिकांच्या पसंतीला हा चित्रपट निश्‍चितच उतरेल, असा आशावाद मुख्य नायक गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

गोपीचंद पडळकर यांचे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्ते आहेत. या चित्रपटाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्याची आघाडीची गायिका श्रेया घोषाल व सोनू निगम या दिग्गजांनी गायिलेल्या 'मन माझे' या गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्‍यामुळे चाहत्‍यांना चित्रपटाबद्दल मोठे आकर्षण निर्माण झाले आहे.


राजकारण व अभिनय

आटपाडी तालुययातील पडळकरवाडीसारख्या छोट्याशा गावात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या गोपीचंद पडळकर यांनी अल्पावधीतच सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. सध्या धनगर आरक्षणाच्या प्रश्‍नावर ते राज्यभर दौरे करत आहेत. या व्यस्त दिनक्रमातूनच त्यांनी हा चित्रपट साकारला आहे. राजकारण्यांना चित्रपट क्षेत्र वर्ज्य नसते. सध्या याही क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकार आघाडीचे राजकारणी आहेत. किंबहुना आपली राजकीय भूमिका देखील एखाद्या चित्रपटातून सहजपणे पोहचवता येऊ शकते. त्यामुळे गोपीचंद यांनी रूपेरी पडद्यावर पर्दापण केले आहे. या दोन्ही क्षेत्रात काम करत असताना दोन्ही क्षेत्राचा चांगला अनुभव समाजसेवा करताना कामी येईल, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

साभार : https://www.pudhari.news/news/Sangli/Gopichand-Padalkar-appears-in-the-film-industry-for-Dhumus-Marathi-film/

२ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.