धनगर संमेलनाच्या निमित्ताने मूक समाज बोलू पाहतोय

संजय सोनवणी, १८ जानेवारी २०१९ : म्हसवड इथे आजपासून तिसरं आदिवासी धनगर साहित्य संमेलन भरतंय. २० जानेवारीला रविवारी समारोप होणाऱ्या या संमेलनात वेगवेगळ्या जातीधर्मातले अभ्यास, संशोधक सहभाग घेणार आहेत. महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृतीचा भाग असलेल्या धनगरी परंपरेचं महत्त्व अधोरेखित करणारा संजय सोनवणी यांचा हा लेख.

नागरी समाजापासून दूर रानावनात, डोंगरदऱ्यात खुल्या आभाळाखाली आपल्या मेंढरांना बरोबर घेऊन भटकंती करणाऱ्या धनगर समाजाने आपली स्वतंत्र संस्कृती विकसित केली. देवीदेवता ते संगीत, नृत्य, साहित्य यातून या संस्कृतीचे वैशिष्ट्यपुर्ण पैलू समोर येतात. नागरी समाजाने सहसा या समाजाची दखल घेतलीच नाही. किंबहूना हा समाज त्यांच्या दृष्टीने अदृश्यच राहिला.

मीडियात आरक्षणापुरतीच चर्चा

शिक्षणाचा अभाव, नागरी संस्कृतीपासून दूर रानावनात राहिल्यामुळे आलेलं बुजरेपण यामुळे हा समाज मुकच राहिला. आधुनिक काळात येवूनही हा समाज केवळ आरक्षणाच्या मागणीपुरता मीडियात झळकतो. त्यापलीकडे या समाजाची माहितीही कोणाला नसते. किंबहुना एरवी हा समाज अस्तित्वात आहे याची खबरबात घेण्याचीही गरज कोणाला भासत नाही.

पण आता चित्र बदलतंय. आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या रुपाने हा मुक समाज बोलू लागलाय. स्वत:कडे नागर समाजाची साथ घेत लक्ष वेधू लागला आहे. सोलापूर इथे आदिवासी धनगर साहित्य परिषदेने पहिलं साहित्य संमेलन घेतलं. नाव धनगर साहित्य संमेलन असलं तरी यात सर्व समाजातल्या साहित्यिक, अभ्यासकांनी भाग घेतला. तीच परंपरा लातूरला भरलेल्या दुसऱ्या संमेलनाने आणि आता माणदेशात म्हसवड इथे भरत असलेल्या तिसऱ्या साहित्य संमेलनाने कायम ठेवलीय.

मौखिक स्वरुपातली प्राचीन साहित्य परंपरा

या प्राचीन पशुपालक समाजाची साहित्य परंपरा तेवढीच पुरातन आहे. किंबहुना आद्य काव्यात्मक अभिव्यक्तीचे उद्गार या आदिम संस्कृतीशी निगडित असलेल्या धनगरांनी महाराष्ट्रात उमटवला. धनगरांचं वाड्मय ओवीरुप काव्य, लोककथा, दैवतकथा या स्वरुपात पिढ्यानुपिढ्या मौखिक स्वरुपात संक्रमित होत राहिलं. सुंबरान मांडत आगळ्या वेगळ्या शैलीत त्यांचं गायन आणि कथनही करत राहिले. कालौघात त्यात भरही पडत गेली.

संगीतमय अभिव्यक्तीसाठी नृत्य हा संस्कृतीतला एक अपरिहार्य भाग. धनगरी ओव्या गुणगुणायला लावणाऱ्या तर धनगरी नृत्य म्हणजे कुणालाही ठेका धरायला लावणारे. पावसाळ्याचे चार महिने सोडलं तर धनगरांची वर्षातली आठ महिने भटकंती ठरलेली असते. अशा भटकंतीत विश्रांती मिळते ती पाणकळ्यात. तेव्हा धनगर आपल्या रंजनासाठी ढोलाच्या लयीत नृत्य करतात. हे धनगरांचं स्वतंत्र असलेले शैलीदार आणि बहारदार नृत्य गजानृत्य नावाने जगप्रसिद्ध आहे. जीवनाचा जोम, उत्साह आणि आपल्या दैवतांप्रती श्रद्धेचा आविष्कार म्हणजे हे गजी ढोलाच्या तालावर होणारं गजानृत्य.

जर्मन बाईने जाणलं धनगरी ओव्यांचं महत्त्व

धनगरी ओवी साहित्याकडे सगळ्यात आधी लक्ष गेलं ते भारतीय संशोधकांचं नाही तर जर्मन संशोधक गुंथर सोंथायमर यांचं. त्यांनीच सर्वप्रथम या राज्यभर विखुरलेल्या असंख्य ओव्यांचं संकलन केलं. जर्मन भाषेत अनुवाद करुन जागतिक वाड्मयात या धनगरी साहित्याला अधिष्ठान दिलं. नंतर काही संशोधकांनीही संकलनाचे प्रयत्न केले. आजही अशा लक्षावधी ओव्या प्रकाशनाची वाट पाहत केवळ स्मरणात किंवा वह्यांत अडकल्यात.

नको त्या साहित्यिक राजकारणात अडकलेल्या राज्य साहित्य संस्कृती मंडळाने खरं तर इकडे लक्ष द्यायला हवं. अन्यथा हा मोलचा सांस्कृतिक ठेवा आधुनिकतेच्या बदलत्या काळात विस्मरणात फेकला जाईल.

आधुनिक काळात साहित्य प्रवाह फार बदललेत. धनगर समाज फार उशिरा आणि तेही अल्पस्वल्प प्रमाणात या प्रवाहात सामील होण्याचा प्रयत्न करु लागला. काव्य, नाट्य, आत्मकथनं, इतिहास लेखन ते कादंबऱ्या या रुपाने क्षीणपणे का होईना धनगरी प्रतिभेचा आवाज उमटू लागला.

नव्या पिढीचा आवाज उमटतोय

नवनाथ गोरेंच्या ‘फेसाटी’ने साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवला आणि धनगरी साहित्यावर मान्यतेची मोहर उमटली. यशपाल भिंगे यांनाही यंदाचा राज्य शासनाचा श्री. के. क्षीरसागर हा मानाचा साहित्य पुरस्कार मिळालाय. आनंद कोकरेंसारखी उत्तुंग प्रतिभा मेंढरांमागे भटकंती करता करता झेपावत प्रस्थापित साहित्यकारांनाही आव्हान देतेय. सोशल मीडियाचा तर तो लाडका ’हिरो’ झालाय. असंख्य कवी आणि कादंबरीकार आता पुढे येवू लागले आहेत.

आदिवासी धनगर साहित्य परिषद या नव्या लेखकांना उमेद द्यायचं काम करतेय. परंपरागत मौखिक परंपरेने चालत आलेल्या ओवी साहित्याकडून आधुनिक साहित्याच्या प्रांताकडे होणारा हा प्रवास आश्वासक असला तरी पुरेसा मात्र म्हणता येणार नाही. त्यासाठीच नवसाहित्यिकांच्या जाणिवांच्या कक्षा रुंदावण्यासाठी साहित्य संमेलन भरवण्यात येतंय.

धनगरांचा राजकीय इतिहासही प्रदीर्घ. महाराष्ट्रात हा इतिहास औंड्र सातवाहनांपासुन सुरु होतो. मध्ययुगात मल्हारराव, अहिल्यादेवी,  तुकोजी, यशवंतराव, भीमाबाई होळकर या अतुलनीय योद्ध्यांच्या इतिहासाकडे अभिजात म्हणवणाऱ्या इतिहासकारांनी अत्यंत कृपणतेनं पाहिलं. त्यांचा संगतवार साधार असा इतिहास मांडला नाही. उलट अवहेलनाच केलीय, असं आपल्याला दिसतं. आता धनगरांनाच आपला इतिहास शोधत नेटकेपणे तो मांडावा लागेल.


महाराष्ट्रासाठीची पॉजिटिव गोष्ट

मीही महाराजा यशवंतराव होळकर ते भीमाबाई होळकरांचा अज्ञात इतिहास शोधून काढत प्रसिद्ध केला. होमेश भुजाडे, यशपाल भिंगे, मधुकर सलगर यासारखे संशोधक या दिशेने प्रयत्न करत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. भाऊसाहेब कऱ्हाडेंसारख्या निर्माता, दिग्दर्शकाने ‘ख्वाडा’ या सिनेमातून अस्सल धनगरी जीवन समोर आणलं.

धनगरांच्या सामाजिक समस्या तर अनंत आहेत. चराऊ कुरणांच्या लुटीमुळे आज त्यांना परंपरागत व्यवसाय करणं अशक्य झालंय. नागरी समाजापासून दूर राहिल्याने आलेल्या अंगभुत बुजरेपणामुळे नवीन वातावरणाशी जुळवून घेणं कठिण जातं. पुर्वी ‘बनगरवाडी’च्या माध्यमातून व्यंकटेश माडगुळकरांनी पहिल्यांदाच माणदेशातल्या धनगरांचं जीवन कलात्मकरित्या समोर आणलं होतं. त्यापलीकडे अन्य समाजांच्या दृष्टीने धनगरांचं जीवन साहित्याचा विषय कधी बनलं नाही. त्यांचा जीवनसंघर्षही अबोलच राहिला. तो स्वर उमटावा, प्रखर व्हावा ही मनीषा होतीच. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून धनगरांचा मुक आवाज उमटायला लागला ही अत्यंत स्वागतार्ह बाब ठरते ती यामुळेच!

जयसिंगतात्या शेंडगे, अभिमन्यू टकले, आण्णासाहेब पाटील वगैरे मंडळीनी पुढाकार घेऊन हे संमेलन सुरू केलं. या संमेलनात सर्वच समाजातल्या प्रथितयश साहित्यिक, संशोधकांचा सहभाग राहिलाय. त्यामुळे त्यांचं धनगरी साहित्य संस्कृतीबाबतचे दृष्टीकोन समजून घ्यायला जशी धनगर समाजाला मदत होते तसंच या घटकांनाही धनगरांच्या अभिव्यक्तीची, त्यांच्या समस्यांची आणि इतिहासाचीही ओळख होते. अन्य समाज आणि नागर समाजापासून दूर असलेल्या धनगरांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा सांस्कृतिक पुल आहे, असं म्हणावं लागतं ते यामुळेच. महाराष्ट्राच्या गढुळलेल्या साहित्य, सांस्कृतिक जीवनातली ही मोठी सकारात्मक घटना आहे हे नक्कीच!

आता चित्र बदलतंय

सोलापूर आणि लातूर इथे झालेल्या आधीच्या संमेलनांना रसिकांनी फार मोठा प्रतिसाद दिला. पण संमेलनाने दिलेल्या व्यापक आशयामुळे मीडियानेही हे आगळंवेगळं संमेलन डोक्यावर घेतलं.

माणदेश हा दुष्काळी भाग तर बव्हंशी धनगरांनी व्यापलेला. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत साहित्यिक मुरहरी केळे. हे साहित्यसंमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी  बाळासाहेब कर्णवर यांनी घेतलेलीय. १८ ते २० जानेवारी या तीन दिवसांत साहित्य, संस्कृती आणि इतिहासाच्या पैलूंवर अनेक मान्यवर विचारवंत, साहित्यिक प्रकाश टाकणार आहेत. व्यापक विचारमंथन होत जीवनाला भेडसावणाऱ्या समस्यांवर व्यापक चिंतन होईल आणि हा मुक समाज बोलता झालेला जगाला पाहता येईल असा विश्वास आहे!

(लेखक हे ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत.)

1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.