आदिवासी धनगर साहित्य संमेलन शुक्रवारी

महाराष्ट्र टाइम्स, १७, जानेवारी २०१९, सोलापूर : माण तालुक्यातील म्हसवड येथे तिसरे तीन दिवसीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शुक्रवारपासून सुरू होणार आहे. साहित्य संमेलनात ग्रंथदिंडीसह परिसंवाद, चर्चासत्रे आणि व्याख्यानांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली.


शुक्रवारी, १८ जानेवारी रोजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि सद्गुरु कारखान्याचे चेअरमन एन. शेषगिरिराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी, १८ जानेवारी रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी केळे यांच्या उपस्थितीत सुभेदार मल्हारराव होळकर साहित्य नगरीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शनिवारी दुपारी धनगर धर्मपीठाची आवश्यकता आहे काय? या विषयावरील चर्चासत्रात बापूसाहेब हटकर, डॉ. अभिमन्यू टकले, विजय गावडे सहभागी होतील. त्या नंतर होळकरशाहीच्या इतिहासातून धनगर जमातीने काय शिकावे? या विषयावर डॉ. यशपाल भिंगे, डॉ. संगीता चित्रकोटी आणि रामभाऊ लांडे मार्गदर्शन करतील. महिलांचे सामाजिक, साहित्यिक व राजकीय योगदान या विषयावर होणाऱ्या परिसंवादात डॉ. उज्वला हाके, डॉ. उषा देशमुख, निहारिका खोदले, विजयमाला खरात सहभागी होणार आहेत. सायंकाळच्या चौथ्या सत्रात समकालीन पत्रकारितेत वंचित समाजाचे स्थान, या विषयावर पत्रकार मंडळी विचार मांडतील. रात्री यशवंतराव तांदळे खुले कवी संमेलन होईल.

रविवारी सकाळच्या सत्रात धनगर अनुसूचित जमातीचे आरक्षण वास्तव, या विषयावर राजा कांदळकर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. त्या नंतर प्रा. डॉ. दत्ता डांगे धनगर जमातीच्या आदीम परंपरा व प्रायोगिक लोककला या विषयावर व्याख्यान देतील. आठव्या सत्रात धनगर समाजातील पारंपरिक व अपारंपरिक उद्योगांचा विकास या विषयावर परिसंवाद होईल. नवव्या सत्रात डॉ. महेश खरात आणि विजय गोफणे यांचे धनगर तरुणांसमोरील आव्हाने व वाटचाल, या विषयावर व्याख्यान होणार आहे. दहाव्या सत्रात धनगर जमातीचे प्रशासनातील स्थान काल, आज व उद्या या विषयावर परिसंवाद होणार आहे. शेवटच्या सत्रात धनगर समाजाची राजकीय वाटचाल, या विषयावर सुभाष बोन्द्रे यांचे व्याख्यान होणार आहे.

रविवारी खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार राजू शेट्टी, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि सातारा झेडपीचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.