मोदींच्या दौऱ्यामुळे सोलापूरमध्ये धनगर नेत्यांवर पोलिसांची दडपशाही

सोलापूर, ९, जानेवारी २०१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवारी) सोलापूर दौऱ्यावर असून येथे ते शासकीय योजनांच्या कामांचे भूमिपूजन, पायाभरणी व लोकार्पण करणार आहेत. या निमित्ताने इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान मोदी यांच्या सभेवर सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाने बहिष्कार घातला आहे.

पंढरपुरात झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.सभेदरम्यान समाजातर्फे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांतर्फे धनगर समाजाच्या नेत्यांची धरपकड करण्यात येत आहे . आतापर्यंत सुमारे १०० कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारावरून ही पोलिसांची दडपशाही असल्याचा आरोप धनगर नेत्यांनी केला आहे .


आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारतर्फे ठिकठिकाणी विकासकामांच्या उद्धघाटनाचा धडाकाच लागला आहे. दरम्यान मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते . धनगर समाजाने भाजपास मोठ्या आशेने मतदान केले होते. पण धनगर समाजाच्या मतांच्या जोरावर राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळवल्यानंतर देखील सरकारने आरक्षणाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. आता धनगर समाज पुन्हा आश्वासनांना बळी पडणार नसून मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे धनगर समाजाच्या नेत्यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने धनगर समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साभार : https://www.maharashtratoday.co.in/due-to-modis-tour-the-repression-of-policemen-on-dhangar-leaders-in-solapur/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.