माण तालुक्‍यात लोकर कातरणीस मेंढपाळांची लगबग

प्रभात, १, जानेवारी २०१९, बिदाल – माण तालूक्‍यातील धनगर समाजाची सध्या मेंढयांची लोकर कातरण्याची धांदल उडाली आहे. टाकेवाडी, दोरगेवाडी, रांजणी, गटेवाडी, पांगरी, देवापूर, विरकरवाडी, पुकळेवाडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, कूरणेवाडी, शेनवडी, या गावात सध्या लोकर कातरण्याचे काम जोमाने सुरू आहे. एका मेंढपाळाकडे साधारण 30 ते 40 मेंढया आहेत.
लोकर ऑगस्ट व डिसेंबर अशी वर्षातून दोनवेळा कातरली जाते. सध्या कातरणीत फार बदल झाला आहे. पूर्वीची इर्जिक पध्दत बंद झाली आहे. सध्या रोजगार देवून लोकर कातरावी लागत आहे. एक कातरकरी साधारण दिवसभरात पाच ते सहा मेंढरे कातरतो. त्यांना एक दिवसासाठी 300 रूपये रोजगार द्यावा लागत आहे.


सध्या मेंढपाळ वर्ग मेंढराची लोकर कातरणारी संख्या कमी होत चालली आहे. सध्याच्या तरूण मेंढपाळांना लोकर कातरणी करण्याचा छंद कमी आहे. कातरकऱ्यांची संख्या कमी असल्याने कातरकऱ्यांची चांदी सुरू झाली आहे. सगळीकडे एकाच वेळी मेंढरांची लोकर कातरत असल्याने कातकर्याचां शोध घ्यावा लागत आहे.

माण तालूक्‍यात सध्या काळ्या लोकरीच्या मेंढरांचा तूटवडा आहे. काळ्या लोकरीला दर चांगला मिळतो. पांढऱ्या, तांबडया लोकरीला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे कधी कधी तर लोकर फुकट द्यावी लागत असल्याचे मेंढपाळ सांगत आहेत. सध्या लोकरीला 15 ते 20 रूपये प्रतिकिलो दर मिळत आहे. कातरणीसाठी लगबग सुरू आहे. मेंढपाळांची संख्या जास्त आहे आणि कातरकऱ्यांची संख्या कमी असल्याने मेंढपाळांना कातरकरी शोधण्यासाठी कसरत करावी लागत. मेंढर कातरण्यासाठी सध्या माण तालुक्‍यात नंबर लागले आहेत. ही लगबग एकाच वेळी असल्याने कातरऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

अशी केली जाते कातरणी
मेंढया कातरण्यापूर्वी दोन ते तीन दिवस अगोदर धूतली जातात. मेंढ्यांची कातरणी दोन प्रकारची असते. एक सरळ कातरणी असते. समान पट्टीच्या रेषेत दोन रेघा काढतात. दुसरी तास पद्धत आहे. मेंढराच्या पाठीवर तिरक्‍या रेषा काढून त्याला गोंडे काढले जातात त्याला तास पध्दत म्हणतात. पूर्वी कातरकरी सामूहिक (इर्जिक) पध्दतीने मेंढयांची लोकर कातरणीचे काम करायचे. आज एकाची, उद्या दूसऱ्याची तर परवा तिसऱ्याची अशी मेंढरांची लोकर कातरत होती. कातरणीच्या दिवशी दिवसभर लोकर कातरण्याचे काम झाल्यांनंतर संध्याकाळी गोड पूरण पोळीचे जेवण कातरकऱ्यांना केले जात होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.